कोल्हापूर दिनांक 13 – वाडी रत्नागिरी (श्री क्षेत्र जोतिबा) येथे यात्राकर ठेक्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या संशयान्वये संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून रकमेची वसुली करण्याच्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जस्मिन यांना देण्यात आले.
श्री क्षेत्र जोतिबा येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक भेट देत असतात.त्या अनुषंगाने मूलभूत सोयी सुविधा पुरविता याव्यात यासाठी ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी येथे दरवर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने कोल्हापूर नाका व गिरोली नाका येथे यात्राकर गोळा करण्यासाठी ठेक्याची निविदा काढून ठेका दिला जातो.यामध्ये कोल्हापूर नाका येथे रु.1,50,00,000 व गिरोली नाका येथे रु.50,00,000 असे मिळून जवळपास रु. 2,00,00,000 इतक्या रकमेचा दरवर्षी ठेका दिला जातो.यात्रकर प्रति व्यक्ती रु.5 इतका आकारला जातो.सदर ठेक्यांमधून ग्रामपंचायतीला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत असते.परंतु सदर ठेक्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून ठेक्याची रक्कम लाटली जात असल्याचा संशय आहे.तसेच सदर ठेक्यांची निविदा प्रक्रिया ही सुद्धा बेकायदेशीरपणे, नियम व कायदा धाब्यावर बसवून राबविली जात असल्याची खात्रीशीर माहिती संघटनेला मिळाल्याचे सांगण्यात आले.तसेच ठेकेदाराने ग्रामपंचायतीकडे जमा केलेल्या रकमा ग्रामपंचायतींच्या खात्यावर अपवाद वगळता जमा केल्या नसल्याचे आढळून आले आहे.तर मग ठेकेदाराला देण्यात आलेल्या पावत्यांचे पैसे गेले कुठे हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे.सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनासह मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूर येथे जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
