
कोल्हापूर, दि.२९ (जिमाका) : कोल्हापूर वन विभागाने गेल्या वीस दिवसांत लोकसहभागातून वनक्षेत्रात ४५० वनराई बंधारे उभारले असून, त्यामुळे सुमारे तीन कोटी लीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. एक हजार बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.
श्री. पाटील म्हणाले की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंवर्धनाचे विविध उपाय करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या उपक्रमाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती तसेच वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभाच्या दिवशी करण्यात आली. या अभियानातून जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश पोहोचवण्यात आला.
या अभियानात ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. वनक्षेत्रात वनराई बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी, भूजल पातळी वाढण्यास तसेच परिसरातील विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास हातभार लागतो. तसेच, पाण्याचा प्रवाह नियंत्रित होऊन मातीची धूप कमी करण्यास आणि मृदसंधारणाचे कार्य साध्य करण्यास मदत होते. जंगलामध्ये वन्यप्राण्यांसाठी पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज जंगलातच भागविण्यास मदत होते, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
जंगलात पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे येत नाहीत. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी होण्यास मदत होते. वनक्षेत्रातील आर्द्रता टिकवून ठेवणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि परिसंस्थेचा समतोल राखणे या दृष्टीनेही या अभियानाचे महत्त्व आहे, असेही त्यांनी सांगितले.
वनमंत्री गणेश नाईक यांनी वनक्षेत्रात पाण्याची उपलब्धता वाढविण्याबाबत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात आले.
अभियान राबविण्यासाठी मुख्य वनसंरक्षक ए. लक्ष्मी आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचेही मार्गदर्शन लाभले.
वनराई बंधाऱ्याची वैशष्ट्ये-
या अभियानांतर्गत लोकसहभागातून अवघ्या वीस दिवसांत अतिशय कमी खर्चात ४५० वनराई बंधारे उभारण्यात आले असून, त्यातून सुमारे तीन कोटी लीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. वन विभागाने एक हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या अभियानामुळे जलसंधारणाला चालना मिळण्यासोबतच वनक्षेत्रातील पाणीसाठा वाढविणे, भूजल पुनर्भरण आणि जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. तसेच, बंधाऱ्यांमुळे वनक्षेत्रात पाणवठे निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांना पाण्याची उपलब्धता होईल. परिणामी, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता कमी होऊन मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासही या उपक्रमाची मदत होणार आहे.
0000