कोल्हापूर दिनांक 06- जुना बुधवार व शनिवार पेठ परिसरातील नॅशनल हायवे वरील वाहतुक कोंडी थांबविणेसाठी पर्यायी वाहतुक मार्गाचा प्रस्ताव मंजूर करून यासाठी आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून लवकरात लवकर पर्यायी वाहतुक मार्ग करावा या मागणीसाठी आज जुना बुधवार पेठ रस्ते सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की “जुना बुधवार व शनिवार पेठेतून नागपूर ते रत्नागिरी असा नॅशनल हायवे अत्यंत दाटीवाटीच्या नागरी वस्तीतून जात असून या हायवेवरून अवजड वाहने, ऊसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टर त्याच बरोबर नोकरदार वर्ग यांची दुचाकी वाहने तसेच पर्यटकांच्या गाड्यांची वर्दळ प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी नागरीकांना रस्ता ओलंडणेचा झाला तरी अगदी स्वतःचा जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागतो. जुना बुधवार पेठ परिसरामध्ये तीन शाळा असून शाळकरी विद्यार्थ्यांना देखील या रस्त्यावरून येणे – जाणे करणे त्रासदायक झाले आहे. या भागातील लहान मुले व वयस्कर व्यक्तींना अक्षरशः तुरुंगात डांबल्याप्रमाणे घरातून बाहेर पडता येत नाही. तसेच अलीकडे दि. 31 जानेवारी, 2026 रोजी पहाटे 3.00 वाजणेचे सुमारास तोरस्कर चौक येथे ऊसाने भरलेला ट्रक्टरची ट्रॉली उलटून शिंगणापूर ते कसबा बावडा या मुख्य लाईनला जोडलेला जलवाहिनीचा व्हॉल्व फुटुन लाखो लिटर पाणी नागरिकांच्या बेसमेंटमध्ये जावून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले दैव बलवत्तर म्हणून या अपघातामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. याच बरोबर मागील महिन्यामध्ये भगतसिंग चौक रस्त्यावर नोकरदार महिला घरी जात असताना वाहतुकीच्या रहदारीमुळे गाडी वरुन तोल जावून डंपर खाली जावून ती महिला चिरडून त्या महिलेचा जागीच दुदैवी मृत्यु झाला. तसेच यापूर्वी अशा अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत.
तेव्हा वरील सर्व घटनांचा आपण गांभियनि व सहानुभुतीपुर्वक विचार करुन लोक वस्तीतून होणारी वाहतुक कोंडी थांबवून तावडे हॉटेल ते सी. पी. आर. चौक येथून सिध्दार्थ नगरचे पिछाडीने ते छत्रपती शिवाजी पुलाचे पुढे असा प्रस्तावित पर्यायी रस्ता व उड्डान पुल या करताचा प्रस्ताव व त्यास लागणारा निधी उपलब्ध करुन जुना बुधवार पेठेतील सर्व नागरीकांना होणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीचे त्रासापासून कायम स्वरुपाची मुक्तता करुन भविष्यात अपघाती घटना घडू नयेत यासाठी सहकार्य करावे अन्यथा प्रशासनाने या निवेदनाची गांभिर्याने दखल न घेतल्यास जुना बुधवार पेठेतील समस्त नागरिक मोठे जनआंदोलन छेडतील. या दरम्यान होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहिल याची नोंद घ्यावी. तरी आपण या प्रकरणी स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर पर्यायी मार्ग व वाहतुकीची कोंडी तसेच होणाऱ्या नवीन रस्त्याच्या उड्डाणपुलासाठी लागणारा निधी उपलब्ध करावा तसेच लवकरात लवकर ही कामे मार्गी लावावीत ही विनंती. तसेच वरील उड्डाणपुलाची घोषणा शासनामार्फत एक वर्षापुर्वी होवून देखील आजतागायत या उड्डाणपुलाचे प्लॅन इस्टिमेट संदर्भात काहीही कार्यवाही झालेली नाही असे समजून येते तरी आपण जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून वरील प्रश्न तातडीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा”अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी जुना बुधवार तालीम संस्थेचे अध्यक्ष रणजीत शिंदे,प्रकाश गवंडी,दीपक काटकर,उदय बाबा भोसले,सुशील भांदिगरे,दीपक देसाई,इंद्रजीत आडगुळे,गणेश जाधव,कपिल नाळे,कपिल सूर्यवंशी,रवींद्र सावंत,जयसिंग पाटील,रवींद्र दळवी,महेश भालेराव,आनंदराव पाटील,रमेश पुरेकर,धनाजी शिंदे सरकार यांच्यासह जुना बुधवार पेठेतील नागरिक उपस्थित होते.
