
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता महाडीबीटी 2.0 या अद्ययावत ऑनलाइन प्रणालीवर शिष्यवृत्ती फ्रीशीप अर्ज नोंदणी करण्याची कार्यवाही विद्यार्थ्यांनी तातडीने करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले.
सन 2018-19 पासून सामाजिक न्याय विभागाच्या सर्व शिष्यवृत्ती योजनांचे कामकाज महाडीबीटी ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. आता हे पोर्टल ‘महाडीबीटी 2.0’ या नव्या स्वरूपात अद्ययावत करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती व शैक्षणिक योजनांचा लाभ घेता येणार आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्यासह शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर मान्य शुल्क अदा करण्यात येते. वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या गटानुसार वार्षिक 2 हजार 500 ते 7 हजार रुपये, तर वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 4 हजार ते 13 हजार 500 रुपये निर्वाह भत्ता दिला जातो.
शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशीप) योजनेंतर्गत संबंधित अभ्यासक्रमासाठी प्राधिकृत संस्थेने महाडीबीटी पोर्टलवर मंजूर केलेल्या शिक्षण व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती शासनामार्फत केली जाते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 300 रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी एकूण 3 हजार रुपये शिष्यवृत्ती आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते.
तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता योजनेंतर्गत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार सरासरी दरमहा 500 ते 700 रुपये, तर वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी दरमहा 700 ते 1 हजार रुपये याप्रमाणे दहा महिन्यांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व फ्रिशिप अर्ज https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तातडीने भरून घेण्यासाठी कार्यवाही करावी. या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची जबाबदारी महाविद्यालयांची असून, विद्यार्थ्यांनीही अर्ज नोंदणीसाठी आवश्यक कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000