
कोल्हापूर, दि. 03 : राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या माथा रस्त्यावरील वेअरिंग कोट दुरुस्तीच्या कामाबाबत 5 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात पाटबंधारे विभागाने खुलासा केला आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील चार वर्षांत कसबा वाळवे बंधाऱ्यावरील माथा रस्त्याच्या वेअरिंग कोटची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. कसबा वाळवे आणि चंद्रे या दोन गावांदरम्यान दूधगंगा नदीवर अन्य कोणताही पूल उपलब्ध नसल्याने या बंधाऱ्यावरील रस्त्याचा दोन्ही गावांतील नागरिक दैनंदिन ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी माथा रस्त्याच्या वेअरिंग कोट दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच कामानंतर आवश्यक असलेली ‘क्युरिंग प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण होण्यासाठी काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान, बंधाऱ्यावरील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली असून दोन्ही गावांतील दळणवळण पूर्ववत सुरू झाले आहे.