
कोल्हापूर, दि. ३ (जिमाका): केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नात्यांतर्गत दत्तक व सावत्र पालक दत्तक प्रक्रियेतील ८ प्रकरणांना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मान्यतेने गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संबंधित पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेद्वारे बालकांचे पालकत्व प्राप्त झाले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाने ही प्रक्रिया पूर्ण केली. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची प्रथम CARA संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली. दत्तक घेणारे व दत्तक देणारे पालक तसेच संबंधित बालकांची आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यांची छाननी करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांनी दत्तक इच्छुक पालकांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. त्यानंतर संबंधित प्रकरणे बाल कल्याण समिती, कोल्हापूरच्या सदस्या शिल्पा सुतार यांच्यासमोर सादर करण्यात आली. समितीच्या मान्यतेनंतर दत्तक प्रक्रियेतील पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.
CARA मार्गदर्शिका २०२२ नुसार आवश्यक चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम आदेशासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या कक्षात सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर नात्यांतर्गत दत्तक व सावत्र पालक दत्तक प्रक्रियेतील ८ बालकांबाबत अंतिम आदेश पारित करण्यात आले.
ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परिवीक्षा अधिकारी प्रमोद महाजन, परिवीक्षा अधिकारी शुभम चरापले, संरक्षण अधिकारी अभिमन्यु पुजारी तसेच अजिंक्य म्हाकवे यांनी सहकार्य केले.
0000