
कोल्हापूर दि. 13 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन परिपत्रकाव्दारे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) मध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 15 जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
निवडणुक आयोग यांनी दिलेल्या निर्देशानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल.
इचलकरंजी उपविभागातील सर्व कामगार मतदारांना आवाहान करण्यात येते की, उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, इचलकरंजी, गेट नं.2. राजाराम स्टेडियम, बस स्थानक समोर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे दुरुध्वनी क्रमांक 0230-2421391 आणि ईमेल आयडी aclichalkaranji@gmail.com या ठिकाणी तक्रार दाखल करावी, असे आवाहन इचलकरंजी सहायक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी केले .
0000