
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना (मधुमक्षिकापालन) 18 जुन 2019 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती तसेच संस्थांकडून योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात येत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी तसेच संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.पी. जौंजाळ यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी संदर्भात माहिती दिली जाते.
या योजनेअंतर्गत वैयक्तीक मधपाळ घटकांसाठी अर्जदार हा साक्षर असावा, त्याची स्वतःची शेती असल्यास प्राधान्य असून वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. केंद्रचालक/प्रगतशील मधपाळ या घटकांतर्गत संबंधित व्यक्ती हा किमान 10 वी उत्तीर्ण असावा. त्याचे वय वर्ष 21 पेक्षा जास्त असावे. संबंधित व्यक्तिच्या किंवा त्या व्यक्तीच्या कुंटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन असावी. लाभार्थ्याकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था या घटकाअंतर्गत संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतेलेली किमान 1 हजार चौरस फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.
लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणपूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे लाभार्थीस अनिवार्य राहील. योजने संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय उद्योग भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कोल्हापूर दुरध्वनी क्रमांक (0231) 2651271 वर संपर्क साधावा.
0000