
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 साठी नामांकन अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभारून रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 13 जुलै 2026 पासून पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून इच्छुक उद्योजकांनी आपले नामांकन अर्ज 28 जुलै पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. जौंजाळ यांनी केले आहे.
यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष असून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार देवून यशस्वी उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण उद्योगांना चालना मिळावी, नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन मिळावे हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे.
नामांकन अर्ज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर तसेच मंडळाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
0000