रविवारी “जुना बुधवार विरुद्ध खंडोबा” हाय व्होल्टेज सामना.संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष.जुना बुधवार डार्क हॉर्स ठरण्याची शक्यता
कोल्हापूर दिनांक 11 – कोल्हापुरात सध्या सुरू असलेल्या चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात संयुक्त जुना बुधवार ने बालगोपाल ला टाय ब्रेकर वर नमवत चषकाच्या अंतिम सामन्यासाठी प्रवेश केला आहे.त्यामुळे सुमारे 25 वर्षानंतर जुना बुधवार टीम च्या स्थापने नंतर चषक जिंकण्याची संधी जुना बुधवार ला आलेली आहे.त्यामुळे तमाम फुटबॉल प्रेमींची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
यापूर्वीच्या उप उपांत्य सामन्यात बलाढ्य पी टी एम ला नमवून जुना बुधवार ने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता.त्यानंतर आज जुना बुधवार आणि बालगोपाल यांच्यात उपांत्य सामना आज पार पडला. दोन्ही संघाकडून दोन दोन गोल झाल्यानंतर टाय ब्रेकरवर जुना बुधवारच्या टी विष्णू,तेजस जाधव,रोहित मंडलिक आणि तनवीर सिंघ यांनी चार गोल केले आणि बालगोपाल कडून तीन गोल झाल्याने जुना बुधवारची फायनल एन्ट्री पक्की झाली.गेली 25 वर्षे जुना बुधवार टीम च्या जडणघडणीसाठी प्रशिक्षक अभिजित वनिरे,युवराज पाटील,महेश शिंदे व मार्गदर्शक विश्वास कांबळे यांचा मोलाचा वाटा आहे.
येत्या रविवारी जुना बुधवारची बलाढ्य अशा खंडोबा टीम शी अंतिम सामना होणार आहे.यापूर्वी खंडोबाने अनेक चषक जिंकले आहेत त्या टीम कडे अनुभव आहे तरी जुना बुधवार टीम काहीही करून फायनल जिंकण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. जुना बुधवार टीम फॉर्म मध्ये असून रविवारी होणारी फायनल जुना बुधवार ने जिंकल्यास जुना बुधवार डार्क हॉर्स ठरू शकते.त्यामुळे चषक जिंकून कोल्हापूरच्या फुटबॉल क्षितिजावर जुना बुधवार टीमची दमदार एन्ट्री झालेली पहायला मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
