
कोल्हापूर, दि. २९ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांतर्गत कर्ज घेतलेल्या व थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांसाठी एकरकमी परतावा (ओटीएस) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा केल्यास थकीत व्याजाच्या ५० टक्के रकमेची सवलत देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू असून, पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ हा राज्य शासनाच्या पूर्ण मालकीचा उपक्रम असून, महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराच्या विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळाकडून वितरित करण्यात आलेल्या कर्जाची थकबाकी असलेल्या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ही एकरकमी परतावा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार लाभार्थ्यांनी संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयाशी ०२३१-२६५३५१२ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
0000