
कोल्हापूर, दि.२८ (जिमाका) : कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाणे वितरण हा घटक राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ७८० हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असून, पात्र शेतकरी गटांना अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे प्रमाणित बियाणे अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे.
पीक प्रात्यक्षिक घटकांतर्गत शेतकरी गटातील लाभार्थी शेतकऱ्यांना किमान ०.४० हेक्टर मर्यादेत 100 टक्के अनुदानावर लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये बियाणे, बीजप्रक्रिया, पीक संरक्षण निविष्ठा, माती नमुने तपासणी, प्रशिक्षण व प्रशिक्षण साहित्य आदी बाबींचा समावेश आहे. रब्बी ज्वारी प्रमाणित बियाणे वितरणासाठी पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीसाठी बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येत आहेत. या घटकासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र असतील.
रब्बी ज्वारी प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज केवळ महाडीबीटी पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र शेतकरी गट तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांनी “महाडीबीटी पोर्टल” https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin येथे ऑनलाइन अर्ज करावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) असणे अनिवार्य आहे. पात्र लाभार्थ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार लाभ देण्यात येईल. प्रमाणित बियाणे वितरणासाठी वैयक्तिक शेतकरी प्राप्त राहतील. लाभार्थ्यांनी प्राप्त बियाण्याचा वापर प्रत्यक्ष पेरणीसाठी करणे आवश्यक आहे. योजनेची अंमलबजावणी तालुकानिहाय व पिकनिहाय मंजूर लक्षांकानुसार करण्यात येणार आहे. प्रमाणति बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रती शेतकरी कमाल 1 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. या घटकासाठी आर्थिक सहाय्याची मर्यादा प्रति शेतकरी कमाल एक हेक्टरपर्यंत राहील. प्राप्त बियाण्यांचा वापर प्रत्यक्ष पेरणीसाठी करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकरी गट व वैयक्तिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर तातडीने ऑनलाइन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी अथवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले.
00000