
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : कृषी विभागाच्यावतीने ‘महाराष्ट्र महिला सक्षमीकरण अधिनियम’ अंतर्गत,भोगावती महाविद्यालय कुरुकली येथे नुकतेच महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीराचे कृषी विभाग व भोगावती महाविद्यालयाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमात करवीर उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी,महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीचे महत्त्व तसेच त्याद्वारे मिळणारे शासकीय लाभ आणि नोंदणीची प्रक्रिया याबाबत माहिती देवून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंब आणि समाज अधिक सशक्त होऊ शकतो असे सांगितले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नेताजी पाटील यांनी महिला सक्षमीकरणासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनी व महिलांमध्ये शेतीविषयक तसेच कायदेशीर बाबींबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होते असे निरीक्षण नोंदविले.
यावेळी कळंबा मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी आकाश माने, उपकृषी अधिकारी दिलीप गुरव , संदीप कांबळे,मंडळातील सर्व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांसह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील महिला शेतकरी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
00000