
कोल्हापूर, दि.२६ (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांत हेल्मेटचा वापर न केल्यामुळे १६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही बाब लक्षात घेता, दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दुचाकी अपघातात डोक्याला होणारी गंभीर दुखापत आणि जीवितहानी टाळण्यासाठी योग्य दर्जाचे हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीनेही निर्धारित मानकांचे हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे.
शाळा-महाविद्यालयांनी सूचना फलक आणि डिजिटल माध्यमांद्वारे हेल्मेट वापर व वाहतूक नियमांबाबत संदेश प्रसारित करावेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करावेत. दुचाकीवर प्रवास करताना ISI/BIS मानांकन असलेले हेल्मेट वापरून त्याचा पट्टा व्यवस्थित बांधण्याबाबतही मार्गदर्शन करावे.
‘हेल्मेट वापरा, वाहतूक नियम पाळा आणि सुरक्षित जीवनाचा संकल्प करा,’ या संदेशाद्वारे जनजागृती करून राबविलेल्या उपक्रमांची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयास कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रयत्नांमुळे रस्ते अपघातांतील मृत्यू आणि गंभीर दुखापती कमी करण्यास मदत होईल.
OOOOO