
कोल्हापूर, दि.२६ (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत केंद्र शासनामार्फत इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास (EBC) तसेच विमुक्त, भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी PM-YASASVI Pre Matric Scholarship आणि PM-YASASVI Post Matric Scholarship या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. या योजनांचे अर्ज केवळ राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरून (NSP) स्वीकारण्यात येणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनीता नेर्लीकर यांनी केले आहे.
PM-YASASVI Pre Matric Scholarship योजनेंतर्गत इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा पात्र मुला-मुलींनी NSP पोर्टलवर अर्ज करावेत. इयत्ता नववी व दहावीतील ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. तसेच इयत्ता पाचवी व आठवीतील मुलींचे शिष्यवृत्ती अर्जही पूर्वीप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत.
महाडीबीटी पोर्टलवरून राबविण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळांमधील विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) व विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांसाठीची गुणवंत शिष्यवृत्ती, VJNT किंवा SBC प्रवर्गातील दारिद्रयरेषेखालील (BPL) विद्यार्थ्यांसाठी खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क भरण्याची योजना, तसेच सैनिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची देखभाल भत्ता योजना या योजनांचे अर्ज पूर्वीप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवरच भरावेत.
PM-YASASVI Post Matric Scholarship योजनेंतर्गत इतर मागासवर्गीय (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय मुलींसाठीच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा समावेश आहे. या चार योजनांसाठीचे नवीन (Fresh) अर्ज केवळ NSP पोर्टलवरच भरावेत. या योजनांसाठी नवीन अर्ज करण्याची सुविधा महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध असणार नाही.
महाडीबीटी पोर्टलवर सुरू राहणाऱ्या योजना- राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, VJNT व SBC प्रवर्गातील इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमांत शिक्षण घेणाऱ्या आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहात राहणाऱ्या VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती योजना, OBC, SBC व VJNT विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजना तसेच शासकीय किंवा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) प्रवेश घेणाऱ्या OBC, VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क परतफेड या योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत.
शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती व अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी National Scholarship Portal (NSP) आणि MAHADBT 2.0 या अधिकृत पोर्टलचा वापर करावा. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित योजनेनुसार योग्य पोर्टलवर आवश्यक माहिती व कागदपत्रांसह ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000