
कोल्हापूर, दि.२२ (जिमाका) : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) औषध भांडारात औषधांचा साठा नसल्याचा दावा करणारा सामाजिक माध्यमांवरील व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेल्या रिकाम्या खोल्या या औषध भांडाराच्या नसून, रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामामुळे रिकाम्या करण्यात आलेल्या खोल्या आहेत. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना नियोजनानुसार औषधांचा पुरवठा सुरू असून, अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२६-२७ या वर्षासाठी औषधे व साधनसामग्री खरेदी करण्याच्या ६ कोटी १९ लाख ७५ हजार १ रुपयांच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यतेनंतर २१ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढील खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी मिळावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
MMGPA प्रणालीतील नोंदीनुसार, १ जून ते २१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील ३० संस्था व विभागांना ३ कोटी ४३ लाख ४६ हजार २५५ रुपये ३२ पैसे किमतीच्या औषधांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच, अन्य जिल्ह्यांतून सुमारे १ कोटी ३० लाख रुपये किमतीची औषधे उपलब्ध करून २१ रुग्णालयांना गरजेनुसार वितरित करण्यात आली आहेत.
सध्या जिल्हा औषध भांडारात ३ कोटी १४ लाख ५८ हजार ६०५ रुपये १४ पैसे किमतीची औषधे उपलब्ध आहेत. एकूण २८६ प्रकारच्या औषधांपैकी ३८ प्रकारच्या औषधांचे तपासणी अहवाल उपलब्ध नसल्याने त्यांचे वितरण करता येत नाही.
रुग्णसेवा अखंडित ठेवण्यासाठी औषधसाठा आणि रुग्णालयांच्या मागण्यांचा नियमित आढावा घेतला जात आहे. एखाद्या विशिष्ट औषधाची किंवा साहित्याची तात्पुरती कमतरता भासल्यास संबंधित रुग्णालयांकडून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) उपलब्ध अनुदानातून औषधांची खरेदी करून रुग्णांना सेवा दिली जात आहे.
औषध खरेदी व वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, नियमांचे पालन आणि रुग्णहित यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांवरील अपूर्ण किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत नोंदींच्या आधारे वस्तुस्थितीची पडताळणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरीता थोरात यांनी केले आहे.
0000