
कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर यांच्यामार्फत डीहायड्रेशन (निर्जलीकरण) तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २२ ऑक्टोबरपासून करण्यात आले आहे. अन्नप्रक्रिया क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी वनिता पाटील यांनी केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात निर्जलीकरण प्रक्रियेतील व्यावसायिक संधी, आवश्यक यंत्रसामग्री आणि निर्जलीकरणाची शास्त्रोक्त पद्धत याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पालक, मेथी, आले, लसूण, हिरवी मिरची, कांदा, कडीपत्ता, पुदिना, गाजर, बीट व केळी यांच्या पावडरी तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात येईल. याशिवाय चिकू, अननस आदी फळांपासून प्रक्रिया उत्पादने तयार करण्याची माहितीही देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान शासकीय अनुदान योजना, उत्पादनांचे विपणन, उद्योगासाठी आवश्यक विविध परवाने, उद्योग व्यवस्थापन आणि बँक कर्जप्रक्रिया याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधी निर्माण करू इच्छिणाऱ्या युवक-युवती, महिला तसेच नवउद्योजकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
00000