
कोल्हापूर, दि. ४ (जिमाका) : मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित प्रवर्गातील नवउद्योजक, विद्यार्थी आणि युवक-युवतींना संशोधनाधारित उद्योगनिर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत ‘सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रम’ राबविण्यात येत आहे.
सन २०२६-२७ या वर्षासाठी सारथी उपकेंद्र, कोल्हापूर विभागांतर्गत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील SUK Research and Development Foundation आणि सांगली येथील NETRA-RIT Foundation या दोन इनक्युबेशन केंद्रांच्या माध्यमातून पात्र उमेदवारांना एक वर्षाचे उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रात १० याप्रमाणे एकूण २० उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी दरमहा २५ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. तसेच स्टार्टअप उभारणीसाठी आवश्यक भौतिक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान संसाधने, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्यवसाय विकास प्रशिक्षण आणि अन्य पूरक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
संशोधन व विकासाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना विकसित करणे, त्यांचे तंत्रज्ञानाधारित स्टार्टअपमध्ये रूपांतर करणे, संशोधनाधारित उद्योगांना चालना देणे आणि नवउद्योजकांना स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
पात्रता निकष : उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तो मराठा, कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा या लक्षित प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. मराठा प्रवर्गातील उमेदवारांकडे शाळा सोडल्याचा दाखला, तर कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील उमेदवारांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार किमान पदवीधर असावा. कुटुंबाचे सर्व स्रोतांतील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. यासाठी संबंधित वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र अथवा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवाराने यापूर्वी सारथी संस्थेकडून कोणताही आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
उमेदवाराकडे स्वतःची नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानाधारित व्यावसायिक कल्पना असणे आवश्यक आहे. या कल्पनेचे एका वर्षाच्या कालावधीत विस्तारक्षम स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्याची क्षमता असावी. प्रशिक्षण व आर्थिक सहाय्याच्या कालावधीत उमेदवाराने उद्योजकीय उपक्रमासाठी पूर्णवेळ कार्यरत राहणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या व्यावसायिक कल्पनेचा औपचारिक व्यवसाय आराखडा व गुंतवणूक प्रस्ताव तयार करून त्याचे सादरीकरण करावे लागणार आहे. या कालावधीत अन्य कोणताही आर्थिक लाभ घेता येणार नाही.
आवश्यक कागदपत्रे : अर्जासोबत जन्मदाखला, जात प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला, लागू निकषांनुसार ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र अथवा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड, अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार संलग्न असलेल्या स्वतःच्या नावावरील राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्याचे पासबुक आणि पदवी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
या उपक्रमासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२६ आहे. पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व इतर सविस्तर माहितीसाठी सारथी संस्थेच्या “अधिकृत संकेतस्थळाला” (https://reference-url-citation.invalid/0) भेट द्यावी.
लक्षित प्रवर्गातील नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना असलेल्या आणि स्वतःचा उद्योग उभारण्याची जिद्द व क्षमता असलेल्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी उपकेंद्र, कोल्हापूरचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले आहे.
0000