
कोल्हापूर, दि. ४ (जिमाका) : रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारी (जिरायत), गहू (बागायत), हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी योजना लागू आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. खातेदार शेतकऱ्यांसह कुळाने अथवा भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरीही योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. योजनेतील अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला असून योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर २०२६, तर इतर रब्बी पिकांसाठी १५ डिसेंबर २०२६ आणि उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२७ अंतिम मुदत आहे.
ही योजना राबवण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेतून पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे. तसेच हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग अथवा तांत्रिक उत्पादनाच्या आधारे महसूल मंडळातील पिकांच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत प्रत्यक्ष उत्पादनात घट आढळल्यास नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, शेतकरी ओळखपत्र क्रमांक (AGRISTACK Farmer ID), ई-पीक पाहणी, आधार कार्ड किंवा आधार नोंदणीची प्रत, ७/१२ उतारा, तसेच भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी करारनामा अथवा संमतीपत्र, पेरणी स्वयंघोषणापत्र आणि बँक पासबुकची प्रत आदी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँक शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, विमा कंपनीचे कार्यालय किंवा आपले सरकार सेवा सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. तसेच www.pmfby.gov.in या पीक विमा पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
पीक नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून कमी करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यास ही योजना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
0000