
कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल अद्ययावत करून ‘महाडीबीटी २.०’ या नवीन स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिष्यवृत्ती व फ्रिशिपचे अर्ज नोंदणी करताना अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी नव्या प्रणालीवर आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
सन २०१८-१९ पासून महाडीबीटी ऑनलाइन प्रणालीद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे कामकाज सुरू आहे. आता नवीन महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकाच्या आधारे नवीन महाआयडी तयार करणे बंधनकारक आहे. आधार पोर्टलवरील पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि शैक्षणिक गुणपत्रिका आदी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात तयार ठेवावीत. नवीन अर्ज (फ्रेश) तसेच नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी महाआयडी किंवा आधार लॉगिनचा वापर करावा. यासाठी मागील वापरकर्ता आयडी व पासवर्डची आवश्यकता नसून, नूतनीकरणासाठी ‘माझा अर्ज नूतनीकरण करावा’ हा पर्याय निवडावा.
महाविद्यालयांसाठी प्राचार्यांचे एकच लॉगिन उपलब्ध राहणार असून, लिपिकांचे स्वतंत्र लॉगिन बंद करण्यात आले आहे. महाविद्यालयांनी मागील वापरकर्ता आयडी व नवीन डीफॉल्ट पासवर्डच्या आधारे लॉगिन करून महाविद्यालयाचे प्रोफाईल, शुल्क निश्चिती व इतर आवश्यक माहिती तपासून अद्ययावत करावी. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहणार आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच सर्व महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिष्यवृत्ती व फ्रिशिपचे अर्ज महाडीबीटी २.० प्रणालीवर भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
0000