
कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती राधानगरी यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना स्वयं-सहायता समूहांशी जोडणे, शासकीय योजनांची माहिती देणे आणि रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमांचा उद्देश होता.
नवीन स्वयं-सहायता समूहांच्या स्थापनेसाठी ऐनी व ठीकपुर्ली येथे वर्धिनी फेरी, तर तुरंबे, आवळी बुद्रुक, शिरगाव, नरतवडे, कासारपुतळे, तारळे खुर्द, पंडेवाडी व अटेगाव आदी गावांमध्ये ग्रामसखी फेरीचे आयोजन करण्यात आले. सुळंबी येथे आयोजित आरोग्य शिबिरात समूहातील ५६ महिलांनी सहभाग घेतला. तसेच तालुक्यातील विविध बँकांच्या माध्यमातून महिला समूहांना कर्जपुरवठा करण्यात आला आणि नवीन समूहांची बँक खाती उघडण्यात आली.
महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आवळी येथे उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ३५ महिलांनी सहभाग घेतला. याशिवाय, लखपती दीदींच्या घरी आशीर्वाद दिवा लावून त्यांच्या आर्थिक प्रगतीचा आणि यशाचा गौरव करण्यात आला. या उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांना संघटित होऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
**