
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यात आरोग्य विभागामार्फत ८९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात १६६ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून एकूण ७ हजार २१ नागरिकांना विविध आरोग्यविषयक सेवा देण्यात आल्या.
या अभियानांतर्गत पाच रक्तदान शिबिरांमध्ये १९७ जणांनी सहभाग घेतला. तसेच २१८ आभा कार्ड, ७५ गोल्डन कार्ड आणि १२५ वयोवंदना कार्ड तयार करण्यात आले. याशिवाय ३६८ जणांची रक्त तपासणी, ५५ जणांची नेत्र तपासणी आणि ५ हजार ३०४ जणांची असंसर्गजन्य आजारांची (एनसीडी) तपासणी करण्यात आली. १४० ईसीजी आणि १५२ एक्स-रे तपासण्याही करण्यात आल्या. तसेच १३ नागरिकांनी अवयवदानासाठी नोंदणी केली.
विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी आयोजित विशेष शिबिरात ३७४ जणांना गोल्डन कार्ड मिळविण्यासाठी मदत करण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्य तपासणीसह विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळविण्यास मदत झाली. तसेच आरोग्यविषयक सेवा आणि योजनांबाबत जनजागृतीला चालना मिळाली.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती, गडहिंग्लज यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात आले.
00000