
स्थानिक साधनसामग्रीचा वापर; महिलांना रोजगाराची संधी, कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार
कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत पन्हाळा तालुक्यातील केखले येथील रेणुका महिला बचत गटाने उदबत्ती निर्मितीचा व्यवसाय सुरू करून महिला सक्षमीकरणाचा आदर्श निर्माण केला आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून उदबत्ती निर्मितीला सुरुवात केल्याने महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.
महिलांनी एकत्रितपणे उदबत्ती निर्मितीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात केली. तयार करण्यात आलेल्या उदबत्त्यांची स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जात आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्याला व्यावसायिक स्वरूप मिळाले असून, कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याबरोबरच स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा आत्मविश्वासही त्यांच्यात निर्माण झाला आहे.
‘बचत गटातून आर्थिक बचत, कौशल्यातून रोजगार आणि व्यवसायातून स्वावलंबन’ हा संदेश देणारा रेणुका महिला बचत गटाचा उपक्रम ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या उपजीविकेला बळ देत विविध व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे चालना मिळत आहे.
0000