
कोल्हापूर, दि. २ (जिमाका) : शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी-केंद्रित, कृतीआधारित तसेच स्थानिक गरजांशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच समाजाच्या सहभागातून जनजागृती करण्यावर या उपक्रमांतून भर देण्यात येत आहे.
‘विकसित भारत’या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे तसेच व्हिडिओंचे तालुका व जिल्हास्तरावर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये हे उपक्रम घेण्यात येत आहेत.
अभियानांतर्गत २ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरावर मानवी रांगोळी व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. मानवी रांगोळीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी असलेल्या तसेच पुरेसे मैदान उपलब्ध असलेल्या शाळांचा सहभाग घेण्यात आला. तसेच ‘नमो सेवागाथा’अंतर्गत कला व नाट्य पथकांमार्फत शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देणारे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
शाळास्तरावर २९ सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धा, २ ऑक्टोबर रोजी वक्तृत्व स्पर्धा आणि १० ऑक्टोबर रोजी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘२०४७ : माझ्या स्वप्नातील भारत’तसेच ‘विकसित भारत’ या संकल्पनांवर आधारित विषयांमधून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना व विचार मांडण्याची संधी देण्यात येत आहे.‘शाळा परिसर स्वच्छता’ उपक्रमालाही जिल्ह्यातील शाळांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ३ हजार १९१ शाळांपैकी २ हजार ४६४ शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून, २ लाख ८ हजार १८९ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १ हजार ६२७ शाळांतील १ लाख ३८ हजार ४०० विद्यार्थी, तर खासगी व्यवस्थापनाच्या ८३७ शाळांतील ६९ हजार ७८९ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
‘टाकाऊपासून टिकाऊ’ या उपक्रमांतर्गत गणेशमूर्ती कार्यशाळा तसेच शैक्षणिक वस्तू निर्मितीचे उपक्रमही राबविण्यात आले. या उपक्रमात एकूण २१२ शाळांमधील ३१ हजार २०९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १२३ शाळांतील ३ हजार २४५, तर खासगी व्यवस्थापनाच्या ८९ शाळांतील २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, वक्तृत्वकौशल्य, सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेची जाणीव, पर्यावरणपूरक दृष्टिकोन तसेच विकसित भारताच्या संकल्पनेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
**