कोल्हापूर, दि. 1 (माध्यम कक्ष) : महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ व्दिवार्षिक निवडणूक-2026 च्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियात प्रसारित करण्यात येणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
उमेदवारांनी सदर जाहिराती प्रमाणित करूनच प्रसारित कराव्यात. तसेच, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनीही जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबीची खात्री करुन घ्यावी. टीव्ही, केबल नेटवर्क/ केबल चॅनेल्स, सिनेमा हॉल्स, आकाशवाणी, रेडिओ, एफएम वाहिन्या, सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या ऑडिओ-व्हिडीओ व्हिज्युअल्स जाहिराती, ई न्यूजपेपरवरील जाहिराती, बल्क एसएमएस किंवा व्हॉईस मेसेजेस, सोशल मीडियावरील जाहिराती, इंटरनेट वेबसाईटवरील जाहिरातींचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. विविध माध्यमांवर निवडणूक प्रचाराचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जाहिरातीच्या प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज व अन्य अनुषंगिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, कसबा बावडा रोड, पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
00000