
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : इयत्ता 11 वी, 12 वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन 2025-26 मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी योजनेचा ऑनलाईन अर्ज नूतनीकरण (Renew) करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन करताना आधार ओटीपी पडताळणी तसेच पासवर्ड रिसेट करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्जाचे नूतनीकरण करता आलेले नाही.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सन 2025-26 मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सन 2026-27 साठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्जाचे नूतनीकरण करावे. ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहे नाहीत, अशा तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांनीही अंतिम मुदतीपूर्वी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे समाज कल्याण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
***