
कोल्हापूर, दि. 29 : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव’ डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून ३०० हून अधिक महिला शेतकरी व शेतकरी बचत गट महोत्सवात सहभागी झाले होते. प्रदर्शनात टाकळा, शेवगा, कुर्डू, दिंडा, फोडशी, कर्टुले, भारंगी, आळंबी यांसह ८० हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले होते. यासोबतच शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी आणलेल्या ताज्या रानभाज्यांना ग्राहकांकडून हातोहात मागणी मिळाली.
प्रदर्शनासोबतच आयोजित करण्यात आलेल्या ‘रानभाजी खाद्य महोत्सवा’ला नागरिकांनी विशेष पसंती दिली. महोत्सवात महिला शेतकऱ्यांसाठी रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण पाककृती सादर करणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कोल्हापूर कृषीवैभव, रानभाज्या, पाककृती व कृषी माहिती atmakopkrishivaibhav.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यावेळी जिल्ह्यातील रानभाज्यांची ओळख, माहिती, पोषणमूल्ये, पारंपरिक पाककृती, आजरा घनसाळ, सेंद्रिय गूळ, मधाचे गाव पाटगाव तालुकानिहाय माहिती आणि संवर्धनबाबत तयार करण्यात आलेल्या वेबसाईट बाबत नागरिकांना माहिती देण्यात आली*
कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. शहाजी कुरणे यांनी उपस्थितांना रानभाज्यांचे आहारातील महत्त्व, त्यातील औषधी गुणधर्म आणि विविध आजारांवर होणारे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपविभागीय कृषी अधिकारी सर्वश्री अरुण भिंगारदिवे, पोपट पाटील, किरण पाटील, आत्मा प्रकल्प उपसंचाल रविंद्र तागड, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील तसेच कृषी विभाग व ‘आत्मा’ यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000