
कोल्हापूर, दि.२६ (जिमाका) : कृषी विभागाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’नव्या स्वरूपात लागू केली असून, योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता वहितीधारक शेतकऱ्यांसह भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. १० सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार सुधारित योजना एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पूर्वीच्या योजनेत प्रामुख्याने खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा समावेश होता. सुधारित योजनेत भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी तसेच पात्र कुटुंबातील सदस्यांचा समावेश करून योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
वहितीधारक खातेदार शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील पती, पत्नी, अविवाहित मुलगी, आई, मुलगा, वडील, सून, घटस्फोटीत मुलगी, विधवा मुलगी तसेच अन्य कायदेशीर वारसदार यापैकी पात्र व्यक्तीला अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास सानुग्रह अनुदान मिळू शकते. लाभासाठी वयोमर्यादा १० ते ७५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, दोन डोळे अथवा दोन हात अथवा दोन पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये, एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये, तर एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
रस्ता व रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, कीटकनाशकामुळे विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडणे, खून, उंचावरून पडणे, सर्पदंश किंवा विंचूदंश, वन्य अथवा पाळीव प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेली दुखापत किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगलीतील मृत्यू अथवा अपंगत्व, आकस्मिक अपघातामुळे अंतर्गत रक्तस्राव तसेच उष्माघात यांचा ग्राह्य अपघातांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
अपघाताची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त पथकाकडून प्रत्यक्ष चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी अहवाल घटना घडल्यापासून ८ दिवसांच्या आत तहसीलदारांकडे सादर करण्याची तरतूद आहे.
लाभार्थी किंवा कायदेशीर वारसदारांनी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण प्रस्ताव दोन महिन्यांच्या आत संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करावा. तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समिती प्रस्तावावर ३० दिवसांच्या आत निर्णय घेणार आहे.
योजनेअंतर्गत मंजूर होणारे सानुग्रह अनुदान डीबीटी पद्धतीने अपघातग्रस्त व्यक्ती किंवा कायदेशीर वारसदाराच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी Integrated Online Portal विकसित करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
सुधारित योजनेचा लाभ पात्र लाभार्थींना मिळण्यासाठी अपघाताची घटना घडल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
0000