
कोल्हापूर दि 17( जिमाका ) आत्मनिर्भर भारत अंतर्गत कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अर्थात (PMFME) योजना होय.या योजनेत प्रति सदस्य 40 हजार तर प्रति स्वयंसहायता गटासाठी कमाल 4 लाख रुपये इतके खेळते भांडवल मिळते. या योजनेचा फायदा बचत गटांनी करून घेवून आपला आर्थिक विकास साधावा असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी केले.
वडणगे येथील हनुमान तरुण मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमावेळी ते बोलत होते. तर सहा. कृषी अधिकारी श्रीमती माधुरी पाटील यांनी शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी ठिबकचा उपयोग करावा असे आवाहन करून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजने संदर्भात सविस्तर माहिती दिली.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे.सार्वजनिक लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद – २०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे. या लोकसंवाद उपक्रमावेळी योगेश भगत , बाबासाहेब जवंदाळ,श्रीधर काटे, महादेव पाटील,पंकज मिरजे, प्रकाश कदम,कुंडलिक पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
***