
कोल्हापूर (जिमाका) 16 : सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर या कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हयात मुलां-मुलींची १८ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. मुलां-मुलींच्या या शासकीय वसतिगृहांमध्ये अनु. जाती, अनु. जमाती विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गामधील शालेय व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळेच्या भोजनाची व राहण्याची अंधरुण-पांघरुनासह मोफत सोय, मासिक दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, प्रोजेक्ट रिपोर्ट भता महाविदयालयाकरीता ड्रेसकोड, वैदयकिय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरीता अॅपरन, स्टेट्सस्कोप, अभियांत्रिकी विदयार्थ्यांसाठी बॉयलर सुट, ड्रॉईंग बोर्ड, लॅब अॅपरन, छत्री, रेनकोड, गमबुट, सहल भत्ता, इत्यादी प्रकारच्या सोयी विनामूल्य उपलब्ध करून देणेकामी डीबीटीदवारे विद्यार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येते.
सन २०२६-२७ या वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन असुन http://hmasnew.mahait.org पोर्टलवर अर्ज स्विकारण्यात येतील तरी गरजू विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित वसतिगृहाचे अधीक्षक यांचेकडे अर्ज भरुन सादर करावेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाची शासकिय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख ३० सप्टेंबरपर्यंत आहे. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही याची संबधितांनी नोंद घ्यावी.
तरी जिल्हयातील इच्छूक विद्याथ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्र. ०२३१-२६५१३१८ याव्दारे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
00000