
कोल्हापूर, दि. १५ (जिमाका): अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी २.० या नवीन प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी भरून घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र माने यांनी केले आहे.
महाडीबीटी २.० पोर्टलवर इयत्ता ९ वी व १० वीतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता ५ वी ते १० वीतील अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना तसेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मॅट्रीकपूर्व शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने या योजनांचे अर्ज भरता येणार आहेत.
महाडीबीटी २.० पोर्टलकरीता https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘लॉगीन’ मध्ये ‘विभाग/संस्थेचा लॉगीन’ मधून शाळेचा युजर आयडी वापरून लॉगीन करावे. मुख्याध्यापक लॉगिनमध्ये सर्व योजनांची यादी दिसेल त्यानुसार संबंधित योजनेसाठी अर्ज करा हा ऑप्शन निवडून आवश्यक माहिती व कागदपत्रे भरून अर्ज ऑनलाईन सबमिट करावा. अर्जाची प्रिंट किंवा पीडीएफ जतन करून ठेवावी.
अधिक माहितीसाठी ०२२-४९१५०८००/ १८००१०२५३११ या क्रमांकावर अथवा helpdesk@mahadbt.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा. तांत्रिक किंवा प्रशासकीय तक्रारींसाठी लॉगीनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
0000