
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद येथे गृहप्रमुख (बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू तसेच दोन वर्षाचा गृहप्रमुख पदाचा अथवा तत्सम अनुभव असल्यास प्राधान्य) या एका पदासाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कामाचा अंदाजित खर्च 3 लाख 9 हजार 925 रुपये तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राधानगरी येथे एक सफाई कामगार 11 महिन्यांच्या कालावधीसाठी एक लाख 30 हजार 152 रुपये अंदाजित खर्च असून वरील पदे भरावयाची आहेत.
ही कामे गगनबावडा व राधानगरी तालुक्यातील असून याप्रमाणे कामे करण्यास इच्छुक तालुका, कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणा-या कार्यरत व नमुद अटी व शर्ती पूर्ण करणा-या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी नमूद कंत्राटी पदांसाठी 28 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयानुसार दरपत्रकासह दिनांक 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
अटी व शर्ती –
बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट, 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस रू. 10 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमीत वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2025-26 ची लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्र देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्याठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकीत प्रती/प्रमाणपत्र मुळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज/प्रस्तावासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकीत प्रत जोडावी. संस्था अवसायानात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.
0000