
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यातील दुधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी हे मोठे प्रकल्प, कडवी, कासारी, कुंभी व धामणी हे मध्यम प्रकल्प तसेच लघु प्रकल्पांतर्गत नद्यांवर शासनाने बांधलेल्या को.प. बंधाऱ्यांमधून पाणी घेणाऱ्या सहकारी पाणीपुरवठा संस्था, वैयक्तिक बागायतदार आणि बिगरसिंचन ग्राहकांसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १ जुलै २०२६ ते ३० जून २०२९ या नियंत्रण कालावधीसाठी ठोक जलप्रशुल्क निश्चित केले आहे.
दिनांक १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या कालावधीसाठी सिंचन व बिगरसिंचन पाणी वापराचे सुधारित दर लागू राहतील. १ जुलै २०२७ ते ३० जून २०२८ या कालावधीत निर्धारित दरांमध्ये १० टक्के, तर १ जुलै २०२८ ते ३० जून २०२९ या कालावधीत २० टक्के वाढ लागू राहणार आहे.
प्रवाही सिंचनाचे दर-
नोंदणीकृत पाणीवापर संस्थांसाठी घनमापन दर खरीप हंगामात ०.०८ रुपये, रब्बीमध्ये ०.१६ रुपये आणि उन्हाळी हंगामात ०.२४ रुपये प्रति घनमीटर राहील. वैयक्तिक लाभधारकांसाठी हे दर अनुक्रमे ०.१०, ०.२० व ०.३० रुपये प्रति घनमीटर आहेत.
खासगी उपसा सिंचन योजनांसाठी आश्वासित पाणीपुरवठ्याचे दर-
पाणी वापरकर्त्या गटाने स्वखर्चाने बांधलेला व स्वखर्चाने व्यवस्थापन होत असलेले धरण / बंधारा व जलाशय / बंधारा तसेच खाजगी उपसा सिंचन पायाभूत सुविधा संबंधित पाणी वापरकर्ता संस्थेव्दारे स्वत:च्या खर्चाने उभारण्यात व देखभाल करण्यात आलेल्या असतील. यासाठी 0.01, 0.02 व 0.03 रुपये प्रति घनमीटर
जलाशय / बंधारा शासनामार्फत उभारण्यात व देखभाल करण्यात आलेला असेल, तथापि, खाजगी उपसा सिंचन पायाभूत सुविधांसंबंधित पाणी वापरकर्ता संस्थेव्दारे स्वत:च्या खर्चाने उभारण्यात व देखभाल करण्यात आलेल्या असतील. यासाठी 0.02, 0.03 व 0.05 रुपये प्रति घनमीटर
पाणी वापरकर्ता गटाने स्वखर्चाने धरण अथवा बंधारा बांधून त्याचे व्यवस्थापन केल्यास पाणीप्रशुल्काचे दर तुलनेने कमी राहतील. संबंधित जलाशय किंवा बंधारा शासनामार्फत उभारण्यात व देखभाल करण्यात आला असून खासगी उपसा सिंचनाची पायाभूत सुविधा पाणी वापरकर्ता संस्थेने स्वखर्चाने उभारली असल्यास त्यासाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत.
पिकनिहाय क्षेत्राधारित दर
वैयक्तिक लाभधारकांसाठी क्षेत्राधारित ठोक जलप्रशुल्कही निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ज्वारी व हरभऱ्यासाठी ४५० रुपये प्रति हेक्टर (खरीप), ९०० रुपये (रब्बी) व १,३५० रुपये (उन्हाळी), गव्हासाठी ९००, १,८०० व २,७०० रुपये, भुईमुगासाठी १,०३३, २,०६७ व ३,१०० रुपये, तर भातासाठी ६७०, १,३४० व २,०१० रुपये प्रति हेक्टर दर राहतील.
इतर अन्नधान्य पिकांसाठी ७२०, १,४४० व २,१६० रुपये, ऊस व केळीसाठी २,३७५, ४,७५० व ७,१२५ रुपये, कापसासाठी ९००, १,८०० व २,७०० रुपये, तर फळबाग लागवडीसाठी १,७८०, ३,५६० व ५,३४० रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आले आहेत.
जलाशय, बंधारा तसेच खासगी उपसा सिंचनाची पायाभूत सुविधा संबंधित पाणी वापरकर्ता संस्थेने स्वतःच्या खर्चाने उभारून त्यांची देखभाल केली असल्यास क्षेत्राधारित दराच्या १० टक्के, तर जलाशय किंवा बंधारा शासनाने उभारलेला व देखभाल केलेला असून खासगी उपसा सिंचन सुविधा संस्थेने स्वतःच्या खर्चाने उभारली असल्यास संबंधित दराच्या १६ टक्के प्रमाणे जलप्रशुल्क आकारण्यात येईल.
बिगरसिंचन वापरासाठीही दर निश्चित
बिगरसिंचन पाणी वापरासाठीही विविध स्थानिक स्वराज्य संस्था व औद्योगिक ग्राहकांसाठी ठोक जलप्रशुल्क निश्चित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका/नगरपंचायत, महानगरपालिका तसेच औद्योगिक प्रवर्गानुसार आश्वासित, नियंत्रित आणि अंशतः आश्वासित पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र दर लागू राहतील. पाणी वापरकर्ता गटाने पायाभूत सुविधा स्वतःच्या खर्चाने निर्माण करून तिची देखभाल केल्यास त्यासाठी स्वतंत्र सवलतीचे दर निश्चित आहेत.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा जलप्रशुल्कासंदर्भातील आदेश www.mwrra.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तरी सर्व संबंधित सिंचन व बिगरसिंचन लाभार्थ्यांनी आपल्या पाणी वापराची व पाणीपट्टीची माहिती संबंधित शाखा कार्यालयातून करून घ्यावी आणि विहित मुदतीत पाणीपट्टी भरून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) मार्फत करण्यात आले आहे.
0000
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.