
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजीमार्फत आगाऊ दोन चाकी MH५१K ही नोंदणी मालिका 9 सप्टेंबरपासून नियमित सुरु करण्यात येत आहे. नवीन दोन चाकी MH५१K पसंती क्रमांकाचे अर्ज 9 व 10 सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ ते ३ या वेळेत कार्यालयात स्विकारण्यात येतील, अशी माहिती इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली.
वाहन नोंदणी क्रमांकांची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावे.
पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातीलच असणे आवश्यक आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश (Cheque) किंवा पेऑर्डर स्विकारला जाणार नाही. असे अर्ज बाद समजण्यात येतील.
डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) काढताना DY REGIONAL TRANSPORT OFFICE, ICHALKARANJI या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक लिहलेला असणे आवश्यक आहे. नवीन दोन चाकी तसेच चार चाकी वाहनांच्या पसंती क्रमांकाबाबत 9 ते 10 रोजी सकाळी ९.४५ ते ३ या वेळेत अर्जासोबत मूळ रकमेचा एकच डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) सादर करावा. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यानंतर पसंती क्रमाकांच्या व (लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या) याद्या प्रसिद्ध केल्या जातील.) ज्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाले असतील अशा अर्जदारांनी जादा रकमेचा एकच स्वतंत्र डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात 11 सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ ते ३ या वेळेत कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.
एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यालयात घेण्यात येईल. लिलावासाठी फक्त अर्जदार / प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. लिलावासाठी येताना अर्जदाराने आपले ओळखपत्र व प्राधिकृत प्रतिनिधी यांचेकडे प्राधिकारपत्र व स्वतःचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
मागणी अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फी चा धनादेश वाहनधारकाने फी ची खात्री करुनच जमा करावा. जरी नजर चुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजीमार्फत देण्यात आली आहे.
0000