
कोल्हापूर दि : 7 (जिमाका) वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात कागल व आजरा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांचा मॅरेथॉन आढावा आज घेतला.
यावेळी बोलताना श्री मुश्रीफ म्हणाले, उत्तुर येथील बस स्थानकाचे प्रलंबित असलेले बांधकाम येत्या आठ दिवसात मार्गी लावावे.मौजे सिद्धनेर्ली येथील हरीजन सोसायटीचे ऑडिट पुन्हा एकदा नव्याने करून ती संस्था पुनर्जीवित करून घ्यावी.तसेच पुनर्जीवित प्रस्ताव डीडीआर (जिल्हा उपनिबंधक) मार्फत जेडीआर (सह जिल्हा निबंधक) ला पाठवावा. जिल्हा प्रशासनाच्या साह्याने कागल तालुक्यातील म्हाकवे येथील गावठाण वाडीतील प्लॉट स्थानिकांना देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. मौजे हणबरवाडी व तमनकवाडा येथील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर तयार करून ग्रामस्थांची सोय करावी. कोगनोळी ते करनुर येथील बोगद्याच्या उंची वाढवण्याबाबतचा प्रश्न कंत्राटदार व ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यावर तोडगा काढावा तसेच ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्या बोगद्याची उंची ठेवावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले .बाळेघोल येथील रामपूरवाडी गावठाणातील 100 प्लॉट ग्रामस्थांना घरे बांधण्यासाठी वाटण्यात आलेले आहेत या प्लॉटची नियमानुसार शासकीय मोजणी करून तेथील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भात भूमि अभिलेख कार्यालयाने सकारात्मक कार्यवाही करावी असेही ते म्हणाले.
आजरा तालुक्यातील उत्तुर इंदिरानगर येथील गावठाणासंदर्भात स्थानिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून भूमी अभिलेख कार्यालयाने पंधरा दिवसात एटीआर (अँक्शन टेकन रिपोर्ट) दाखल करावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी या बैठकीत दिले तर कागल तालुक्यातील बाळेघोल येथील राहणाऱ्या नागरिकांना लेआउट प्रमाणे प्रॉपर्टी कार्ड मिळावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी या बैठकीत केली.
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील मौजे सिद्धनेर्ली, बाळेघोल मांगनुर, म्हाकवे हणबरवाडी,तमनकवाडातसेच आजरा तालुक्यातील उत्तुर येथील नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांचा दीर्घ असा आढावा घेतला. या बैठकीसाठी माजी आमदार संजय घाडगे जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख शिवाजी भोसले उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी, हेमंत निकम, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, कागल तहसीलदार अमरदीप वाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर भाऊसाहेब हजारे, एसटीच्या वैशाली भोसले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.
0000