
कोल्हापूर दि : 3
कागल तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व अन्न व औषध प्रशासन (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय तालुकास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बहुउद्देशीय सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी गटशिक्षण अधिकारी सारिका कसोटे होत्या.
याप्रसंगी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ व्ही.ए आरळेकर यांनी ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियानांतर्गत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी कोटपा (COTPA) कायदा २००३, शाळा परिसरातील १०० यार्ड नियमाचे तंतोतंत पालन, शालेय तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना आणि तंबाखूमुक्त शाळेचे ९ निकष यावर सविस्तर माहिती देवून बालपण व्यसनमुक्त ठेवण्यासाठी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांनी आपली भूमिका सक्रियपणे बजावावी, असे आवाहन केले तर अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी पांडुरंग घुगे यांनी सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सकस अन्नाचे महत्त्व सांगतानाच शाळांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे पालन कसे करावे आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत काय आणि कशा प्रकारे काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी श्रद्धा साळुंखे यांच्यासह कागल तालुक्यातील शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.