
कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असून, त्याचा थेट प्रकाश डोळ्यांवर पडल्याने डोळ्याच्या पडद्याला तसेच बुबुळाला इजा होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट डोळ्यांवर पडल्याने भाविकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेशमूर्ती आगमन, घरगुती गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक तसेच अन्य कार्यक्रमांदरम्यान लेझर लाईटचा वापर प्रतिबंधित करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आयोजित मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा शो/वापर करण्यास प्रतिबंध केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000