
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत सन 2026-27 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्याने त्यासाठी प्रस्ताव सादर करू नयेत.
असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर खरेदी 4 लाख रु.व इमारत बांधकाम 10 ते 15 लाख रु. अर्थसहाय्य, ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी 2.50 लाख रुपये व विशेष आधुनिकीकरणासाठी 2 लाख रुपये, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी 6.20 लाख रुपये व इमारत विस्तारासाठी 10 लाख रुपये, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमांसाठी 1.50 लाख, 2.50 लाख व 3 लाख रुपये, तसेच ‘बाल कोपरा’ स्थापन करण्यासाठी 6.80 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
इच्छुक ग्रंथालयांनी www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना व नियम-अटी उपलब्ध करून घ्यावेत. वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठी विहित मार्गाने आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेतील प्रस्ताव चार प्रतींत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 31 ऑगस्ट पर्यंत सादर करावेत. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या ऑनलाईन प्रणालीद्वारेही प्रस्ताव सादर करावेत.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
0000