
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : महाराष्ट्रात सन 2047 पर्यंत 300 कोटी वृक्षारोपण मोहिम व इतर हरित पायाभूत सुविधा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र आयोग’ स्थापन करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ 1 लाख 92 हजार वृक्ष लागवड झाली आहे. अनेक यंत्रणांचा या मोहिमेत प्रतिसाद दिसून येत नाही. याची दखल घेवून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व यंत्रणांनी त्यांना दिलेली उद्दिष्टपूर्ती या पावसाळ्यात करावी, असे निर्देश दिले.
जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन 2026 च्या पावसाळ्यात 5 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले असून, सन 2047 पर्यंत दरवर्षी 5 लाख रोपे लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
सन 2026 च्या पावसाळ्यात 15 जून ते 30 सप्टेंबर या वनमहोत्सव कालावधीत शासकीय, निमशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरिकांना वृक्षलागवड करता यावी, यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या 5 लाख वृक्षलागवड उद्दिष्टाच्या तुलनेत विविध यंत्रणांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून आतापर्यंत केवळ 3.18 लाख रोपे उपलब्ध करून घेतली आहेत. त्यामुळे उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी तातडीने नियोजन करून वृक्षलागवड मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यामध्ये रेशीम लागवड (वस्त्रोद्योग विभाग) कार्यालयाने 1 लाख 44 हजार 556, ग्राम विकास विभागाने 15 हजार 498, जलसंपदा विभागाने 5 हजार 150, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 6 हजार 870 रोपांची लागवड केली आहे. उर्वरित विभागांनी तात्काळ नियोजन करुन वृक्ष लागवड करावी, असे निर्देशित केले आहे.
सन 2026 च्या पावसाळ्यातील वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभाग व यंत्रणांनी आवश्यक नियोजन करून सामाजिक वनीकरण विभागाच्या नजीकच्या रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून घ्यावीत. तसेच, खाजगी रोपवाटिका अथवा इतर ठिकाणाहून रोपे उपलब्ध करून घेतली असल्यास त्याची माहिती सामाजिक वनीकरण विभाग, कोल्हापूर यांना कळवावी, असे आवाहन जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय वन अधिकारी यांनी केले आहे.
0000