कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी जिल्हा गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये जिल्ह्यातील एकूण 203 उद्योक घटकांमार्फत 6 हजार 105 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात येणार असून या माध्यमातून 20 हजार 835 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
आयुक्त (उद्योग) आयुक्तालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या परिषदेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नवीन उद्योगांची स्थापना, विद्यमान उद्योगांचा विस्तार तसेच विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमुळे स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. ही परिष्ज्ञद 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 ते सायं. 4 वाजेपर्यंत हॉटेल रसिका, मुक्त सैनिक वसाहत, श्री शाहू मार्केट यार्डसमोर येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या उपआयुक्त (उद्योग व सेवा) विद्या कुलकर्णी यांनी दिली.
6 हजार 105 कोटींची गुंतवणूक- 20 हजार 835 रोजगार
जिल्हा गुंतवणूक परिषदेअंतर्गत 203 उद्योग घटकांशी संबंधित गुंतवणूक प्रस्तावांना चालना मिळणार असून, एकूण 6 हजार 105 कोटींची गुंतवणूक होणार आहे. या गुंतवणुकीतून तब्बल 20 हजार 835 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या एकदिवसीय परिषदेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांतील तज्ज्ञ अधिकारी व प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये MSME उद्योजकांसाठी उपलब्ध विविध योजना व सुविधा, निर्यातदारांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना, SIDBI व NABARD च्या विविध सुविधा, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उपलब्ध होणारे लाभ, भारतीय डाक विभागाच्या लॉजिस्टिक्स सेवा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
या परिषदेस सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक, उत्पादक, निर्यातदार, संभाव्य उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक तसेच केंद्र व राज्य शासनाचे संबंधित अधिकारी आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेमुळे जिल्ह्यातील उद्योजकांना विविध शासकीय योजना, आर्थिक सहाय्य, सवलती, तांत्रिक सुविधा, निर्यातविषयक मार्गदर्शन तसेच गुंतवणुकीच्या उपलब्ध संधीची माहिती एकाच व्यासपीठावर मिळणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व उद्योजक, नवउद्योजक, संभाव्य गुंतवणूकदार व निर्यातदारांनी ‘जिल्हा गुंतवणूक परिषदे’ चा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
0000
