
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा येथे दि. 17 व 18 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा होत आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर येत असतात. जोतिबा डोंगरावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 33 (1) (क) अन्वये वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत.
जोतिबा डोंगरावरील वाहनांची संख्या, उपलब्ध पार्किंग व्यवस्था तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रमुख मार्गांवर वाहनांचे पार्किंग झाल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुने आंब्याचे झाड, प्रवासी टोलनाक्याजवळील नवीन एस.टी. बसस्थानक रोड, जुने एस.टी. स्टँड रोड, सेंट्रल प्लाझासमोरील रोड, पी.डब्ल्यू.डी. रेस्ट हाऊससमोरील रोड, यमाई मंदिर कॉर्नर, गिरोली घाट ते गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
ही अधिसूचना 17 ऑगस्ट रोजी रात्री 12.01 वाजेपासून 18 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
0000