
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल, ता. भुदरगड येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये 34 खासगी उद्योजकांकडून 3 हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता विविध प्रकारची महामंडळे उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ व इतर महामंडळे माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या तीन प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.
0000