
कोल्हापूर, दि.१४ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावपातळीपासून विविध आरोग्य संस्था तसेच जिल्हास्तरापर्यंत कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील विविध आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी स्वातंत्र्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचा थेट ऑनलाइन जनसंवाद कार्यक्रम दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथून या ऑनलाइन सभेचे व उद्घाटनचे नियोजन करण्यात आले आहे.
या जनसंवादाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती (VHNSC), जन आरोग्य समिती (JAS), रुग्ण कल्याण समिती (RKS) तसेच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती यांच्या अशासकीय सदस्यांशी मंत्री महोदय थेट संवाद साधणार आहेत. आरोग्य विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, आरोग्य सेवांची गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग तसेच स्थानिक पातळीवरील आरोग्यविषयक प्रश्न याबाबत या संवादातून थेट चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली असून, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर JAS व VHNSC समितीतील अशासकीय सदस्यांना एकत्रित उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच संबंधित मान्यवरांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.
गावपातळीवर VHNSC समितीचे सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांनी नजीकच्या अंगणवाडी केंद्रात अथवा ग्रामपंचायत कार्यालयात एकत्रित उपस्थित राहून ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हास्तरावरील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित आरोग्य संस्थास्तरावर उपस्थित राहून जनसंवाद कार्यक्रमात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दि. १५ ऑगस्ट रोजी आरोग्य संस्थांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री , राज्यमंत्री संबोधित करतील. तसेच यावेळी राज्यातील विविध नवीन आरोग्य संस्थांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईल.
या जनसंवादासाठी निवडक सदस्यांच्या थेट द्वि-मार्गी संवादाकरिता स्वतंत्र ECHO लिंक उपलब्ध करून देण्यात येणार असून, इतर समिती सदस्यांसाठी YouTube/ब्रॉडकास्ट लिंकद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध राहणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध समित्या या आरोग्य व्यवस्थेतील लोकसहभागाचा महत्त्वपूर्ण दुवा असून, या ऑनलाइन जनसंवादामुळे गावपातळीवरील आरोग्यविषयक प्रश्न, सूचना व अपेक्षा थेट शासनस्तरापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित समिती सदस्यांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या जनसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.