
कोल्हापूर 14 (जिमाका) : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्यालयात पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वा. या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नयेत. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्या पूर्वी किंवा सकाळी 9.35 वा. च्या नंतर आयोजित करावा.
कोल्हापूर जिल्हा मुख्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, शौर्य पुरस्कार विजेते, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, आणिबाणीच्या काळात कारावास भोगलेल व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
***