
कोल्हापूर दि:22 (जिमाका) रक्तदानामुळे रुग्णांचे जीवन वाचण्यास मदत होते.रक्तदान हे अतिशय पुण्याचे काम आहे.आज होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी अभूतपूर्व रक्तदान करावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीदिनानिमित्त तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागामार्फत आज रक्तदान , विशेष आरोग्य तपासणी शिबिर तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर जनसेवा सप्ताह अंतर्गत महाआरोग्य सेवा अभियानाप्रित्यर्थ CPR मधील मेट्रन वार्ड सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर व आरोग्य जनजागृती रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ गिरीश कांबळे ,माजी अधिष्ठाताडॉअजित लोकरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .सरिता थोरात,महाकेअर फाउंडेशन कॅन्सर केअरचे सीईओ डॉ अजय चंदनवाले,नगरसेवक आदिल फरास आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले ,सुमारे दोनशे कोटी रुपयांहून अधिक खर्च करून सीपीआर येथील नूतनीकरण करण्यात आले आहे .या नूतनीकरण वास्तूचे कदाचित येत्या ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल. तत्पूर्वी सीपीआरमधील विभाग प्रमुखांनी या रुग्णालयाच्या अनुषंगाने ज्या – ज्या सोयी सुविधा लागणार आहेत त्याची मागणी त्वरीत करावी . त्या सर्व सोयी सुविधा वैद्यकीय विभागामार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी रुग्णांची दर्जेदार तपासणी करण्यात यावी असे निर्देश देऊन स्वर्गीय अजित दादा यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांचा स्वर कातर झाला होता.
प्राथमिक स्वरूपात 5 रक्तदात्यांना मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्रे देण्यात आली .यावेळी सुमारे 500 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले .याप्रसंगी सीपीआर मधील सर्व विभाग प्रमुख , संबंधित डॉक्टर , नर्सेस व वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .