
इचलकरंजी, दि. २२ : पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि ‘नशामुक्त अभियान’ चा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने इचलकरंजी येथील रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या ७० सायकलपटूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या सहकार्याने इचलकरंजी ते पंढरपूर असा सुमारे १६५ किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती आणि सायकलिंगद्वारे आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
शिवतीर्थ येथून पहाटे ५.३० वाजता सायकल वारीला प्रारंभ झाला. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष पंकज कोठारी, माजी अध्यक्ष प्रकाश रावळ, इचलकरंजी महानगरपालिकाचे क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रिंगण फिटनेस फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन खोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वारीला सुरुवात झाली.
इचलकरंजी–मिरज–सांगोला–पंढरपूर असा सुमारे १६५ किलोमीटरचा प्रवास सायकलपटूंनी यशस्वीरीत्या पूर्ण केला. कडक उन्हाचा तडाखा, अधूनमधून वाहणारे वेगवान वारे आणि प्रदीर्घ प्रवास अशा आव्हानांवर मात करत सर्वांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प आणि “नशामुक्त जीवन – निरोगी जीवन” हा संदेश जपत वारी पूर्ण केली.
या वारीमध्ये ज्येष्ठ सायकलपटू कृष्णात गोंदुकुप्पे, शेखर पवार, नारायण जाधव, संतोष पाटील, अॅड. जिया शेख, शितल दुधाणे, वैशाली माळी, स्वप्निल मद्यामघोळ, किसन अक्कतंगेरहाळ यांच्यासह एकूण ७० सायकलपटूंनी सहभाग नोंदविला.
९० दिवसांत १०,१११ किमी सायकलिंगचा विक्रम
इचलकरंजी महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी कृष्णात गोंदुकुप्पे यांनी पंढरपूर चॅलेंज सायकल वारीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ९० दिवसांत १०,१११ किलोमीटर सायकलिंग पूर्ण केले. या कामगिरीबद्दल त्यांनी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे २,६०० सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली आणि व्यसनमुक्त जीवनाचा आदर्श त्यांनी आपल्या कामगिरीतून समाजासमोर ठेवला.
0000