
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज व नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर 15 मे ते 31 जुलै या कालावधीत अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर सादर करणे आवश्यक असून, प्रत्यक्ष किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
‘सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन (Most Outstanding Person with Disabilities)’, ‘श्रेष्ठ दिव्यांगजन (Outstanding Person with Disabilities)’ आणि ‘श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका (Outstanding Creative Divyang Child)’ या उपवर्गांसाठी यूडीआयडी (UDID) कार्ड किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.
पात्रता निकष, मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर तपशील विभागाच्या संकेतस्थळावर तसेच राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
00000