
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या व परिवहन आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश अमराठी रिक्षाचालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान मिळावे, प्रवासी व रिक्षाचालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व्हावा तसेच मराठी भाषा संवर्धनाच्या शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी हा होता.
कार्यक्रमात शासनाने नियुक्त केलेल्या प्रशिक्षकांनी अमराठी रिक्षाचालकांना दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे मराठी शब्द, वाक्यरचना, प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्याची पद्धत, शिष्टाचार तसेच व्यवहारिक मराठीचा योग्य वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी श्रीमती डॉ. ज्योती ठाकरे (माजी अध्यक्ष, राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ व सल्लागार, कोकण मराठी साहित्य परिषद), डॉ. हर्षला प्र. लिखिते (प्राचार्य, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय) तसेच डॉ. प्रा. प्रदीप ढवळ (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ व कार्याध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद) यांनी मार्गदर्शन केले.
उपस्थित रिक्षाचालकांनी या मार्गदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, श्रीकृष्ण नकाते तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000