
कोल्हापूर, दि. 09 (जिमाका): वैद्यकीय (MBBS, BAMS आदी) व अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या बीए, बीएससी, बीकॉम, डिप्लोमा किंवा इतर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपचा अर्ज भरताना दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
दरवर्षी अनेक विद्यार्थी NEET, CET व CAP प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. अपेक्षित व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळेपर्यंत काही विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात आणि त्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज भरतात. मात्र, नंतर त्याच शैक्षणिक वर्षात किंवा पुढील वर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्यास, पूर्वीच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यामुळे नव्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज महाडीबीटी प्रणालीत अपात्र ठरू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशावेळी समुपदेशन करणे, सूचना फलक व डिजिटल माध्यमांद्वारे जनजागृती करणे, शिष्यवृत्ती अर्जाबाबत योग्य मार्गदर्शन करणे तसेच प्रवेशावेळी स्पष्ट लेखी सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, तात्पुरत्या प्रवेशादरम्यान मिळालेली शिष्यवृत्ती शासनाकडे चलनाद्वारे परत करण्याबाबत कोणतीही वित्तीय तरतूद सध्या अस्तित्वात नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे, कारण ही रक्कम डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते.
भविष्यात व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिपपासून कोणताही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी सर्व महाविद्यालयांनी या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
0000