
योजनेचे नाव: सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रम
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या कौशल्य विकास विभागामार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील युवक-युवती आणि महिलांच्या रोजगारक्षमता, उद्योजकता व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध कौशल्य विकास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रम हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींमध्ये उद्योजकता विकसित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना व्यवसाय संकल्पना विकसित करण्यापासून ते उद्योग उभारणीपर्यंत आवश्यक मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य, कौशल्य प्रशिक्षण, उद्योग व्यवस्थापन, वित्तीय नियोजन, विपणन तंत्रे तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांना आणि युवकांना रोजगार शोधणाऱ्यां ऐवजी रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनविण्यावर या उपक्रमाचा भर आहे.
योजनेअंतर्गत राज्यातील विविध मान्यताप्राप्त इनक्युबेशन केंद्रांमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाते. व्यवसाय आराखडा तयार करणे, स्टार्टअप नोंदणी, बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग आणि उद्योग संचालन याबाबत प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण देण्यात येते. सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रमांतर्गत विद्यार्थांना दरमहा २५ हजार रुपये याप्रमाणे १ वर्षाकरिता ३ लाख इतके विद्यावेतन अदा केले जाते.
सारथी उपकेंद्र कोल्हापूर अंतर्गत Shivaji Centre for Innovation, Incubation and Linkages (SUKRDF), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व NETRA RIT, इस्लामपूर, सांगली या केंद्रांमार्फत सन २०२४-२५ व २०२५ -२६ या कालावधीत एकूण १६ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये जैविक कृषी बूस्टर, झिंकयुक्त तांदूळ उत्पादन, जैवविघटनशील वैद्यकीय उत्पादने, कमी खर्चातील पोर्टेबल व्हेंटिलेटर, IoT आधारित स्मार्ट कचरापेटी, आरोग्यपूरक उत्पादने तसेच स्वयंचलित वृक्ष सिंचन यंत्रणा यांसारख्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सचा समावेश आहे. या उपक्रमामुळे युवक-युवतींना रोजगार शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्मिती करणारे उद्योजक बनण्याची संधी मिळत असून, राज्यात उद्योजकतेची संस्कृती बळकट होण्यास आणि आत्मनिर्भर महाराष्ट्राच्या निर्मितीस चालना मिळत आहे.
1.सारथी लाभार्थी सर्वेश्वर देसाई यांची यशोगाथा :
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या SUKRDF इन्क्युबेशन केंद्रातून निवड झालेले सर्वेश्वर देसाई हे या उपक्रमाचे यशस्वी लाभार्थी आहेत. सारथीच्या आर्थिक सहाय्यामुळे त्यांना व्यवसाय वाढीसाठी आवश्यक गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास मिळाला.
आज ते “LayerCraft Technologies” या उद्योगाच्या माध्यमातून ते 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणपूरक, नाविन्यपूर्ण आणि आधुनिक गरजांनुसार उत्पादने विकसित करत आहेत. सारथी संस्थेकडून मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे त्यांना उत्पादनांची प्रभावी जाहिरात करता आली, नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचता आले आणि स्वतःच्या ब्रँडची स्वतंत्र ओळख निर्माण करता आली. यामुळे त्यांच्या उद्योगाच्या विस्ताराला नवी चालना मिळाली असून व्यवसायाच्या वाढीस गती प्राप्त झाली आहे. आज त्यांच्या उद्योगामुळे चार जणांना रोजगार उपलब्ध झाला असून वार्षिक सुमारे 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
2. सारथी लाभार्थी अभिजीत शांताराम पाटील यांची यशोगाथा :
सारथी संस्थेच्या सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्यूबेशन) उपक्रमाच्या सहाय्याने Kolra Globalcrops Private Limited ने जैव-संपोषित भात उत्पादन, शेतकरी समन्वय, कापणीनंतरचे व्यवस्थापन आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधींचा यशस्वी अभ्यास केला. कंपनीने विविध कृषी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि खरेदीदारांशी नेटवर्किंग मजबूत करत निर्यातक्षम कृषी उत्पादनांच्या संधींचा शोध घेतला.
यासोबतच शैक्षणिक संस्थांशी उद्योग-शिक्षण दुवा निर्माण करून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप व प्रकल्प प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या उपक्रमातून मिळालेली व्यवसाय नियोजन, बाजारपेठ विश्लेषण, संशोधनाधारित दृष्टिकोन आणि व्यवस्थापन कौशल्ये यामुळे कंपनीने शेतकरी, कृषी संस्था आणि बाजारपेठ यांना जोडणारे शाश्वत व्यवसाय मॉडेल विकसित केले.
आज Kolra Globalcrops Private Limited ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मूल्यनिर्मिती करणारे, पोषणकेंद्रित आणि जागतिक बाजारपेठेकडे वाटचाल करणारे स्टार्टअप म्हणून यशस्वीपणे पुढे जात असून, या यशामागे सारथीच्या इनक्यूबेशन उपक्रमाचे मार्गदर्शन आणि पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले आहे.
सारथीच्या कौशल्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या विविध योजनांमुळे युवक, युवती व महिलांना रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळत आहे. राज्य शासनाच्या कौशल्य विकास व आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्दिष्टांना पूरक ठरत या योजनांद्वारे समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असे आवाहन सारथीच्यावतीने करण्यात आले आहे.
0000